कापूस घरात, अनुदानही नाही, उसाचे बीलही नाही, पेरणी मात्र तोंडावर !
🔰शेतकरी चिंतेत : जादा दराची आशा शेतकऱ्यांच्या अंगलट
गेवराई
दि. २१ जादा दराच्या आशेने यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलेला आहे. परंतु आता हाच निर्णय शेतकऱ्यांच्या अंगाशी आलेला दिसत आहे. सुरुवातीला ९००० पार गेलेल्या कापूस आजमितीला ७००० च्या आसपासच घुटमळतोय. त्यामुळे इतके दिवस सांभाळून ठेवलो कापूस कमी किंमतीत विकायचा का या द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकला आहे.
विविध साखर कारखान्यांनी ऊस तोडून नेला परंतु अनेकांचे बीलच निघालेले नाही. त्यात पेरणी तोंडावर आलेली असताना आता काय करायचे असा काळजीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
यावर्षी कापूस सुरूवातीला ९००० च्या वर थोडा भाव घेताना दिसला. त्यामूळे दर १०००० च्या पुढे जातील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय आता फसतो की काय असे चित्र दिसत आहे. कारण पेरणी एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. पेरणी अगोदर कापूस विकावाच लागेल अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना अवघ्या काही दिवसांत निर्णय घ्यावाच लागणार आहे.
पाच सहा महिन्यांपासून घरात साठवून ठेवलेला कापूस वजनात बराचसा घटलेला असताना तो कमी भावात विकताना शेतकऱ्यांना जड जाणार आहे. पण पेरण्यासाठी कापूस विकावाच लागेल अशी स्थिती असल्याने व्यापारीही कापूस घेताना सावधानता बाळगत पावसाळा जवळ आल्याने व्यापारी एकदम जास्त कापूस खरेदी करत नाहीत. कारण पावसापुर्वी कापसाचे गाठण करताना कापूस ठेवण्यास सुरक्षित जागा, मजूर हे घटक लक्षात घेऊन व्यापारीही आहे.
कापूस खरेदीसाठी जास्त ऊत्सुक नाहीत. पेरणी महिन्यावर आली असल्याने खते, बियाणांसाठी पैशाची तजविज करताना शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.
कारखान्यांनीही लांबवले पैसे
यावेळी लवकर साखर हंगाम संपला. पण अनेक कारखान्यांनी पेरणी जवळ आली तरी अजूनही शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे दिसत आहे.
अनुदानाचे भिजत घोंगडे
शासनाकडून यावेळी अनुदान वाटप करताना थेट हस्तांतरण या पद्धतीने आधार जोडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान पाठवले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे चालू खाती आधारला जोडलेली नसल्याने ते शेतकरी अजुनही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची रक्कम अशा खात्यावर पडली आहे की ते खाते त्यांना माहीतच नाहीत.
त्या शेतकऱ्यांचे पैसेही असून नसल्यासारखे आहेत, तर काहींचे कर्ज खात्यावर गेल्याने ते बँकानी होल्ड करुन ठेवलेत. बऱ्याच शेतकऱ्यांची खाती आहेत ती आधारला जोडलेली आहेत तरीही अनुदान मिळालेले नसल्याने शेतकरी पेरणीसाठी तरी अनुदान मिळावे अशी अपेक्षा ठेवून आहे.

Comments
Post a Comment